अमरावती : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा विषाणू उष्णतेबाबत संवेदनशील आहे. व्यावसायिक चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, नागरिक यांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेनेही परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार पुणे, सोलापूर, नवेगाव बांध परिसरातून पक्षी आणणे, स्थलांतरित करणे याबाबत अधिक दक्षता घेण्याचे परिपत्रकात नमूद आहे. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे, खाद्य देण्यात येणारी भांडी डिटर्जंटने स्वच्छ धुवावी. शिल्लक मांसाची योग्य विल्हेवाट लावावी. एखादा पक्षी मरण पावला, तर उघड्या हाताने स्पर्श करू नये. तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवावे. पोल्ट्री उत्पादकांनी व तेथील कामगारांनी हातांची स्वच्छता व परिसर नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
कच्चे चिकन उत्पादन हाताळताना मास्क व ग्लोव्हज वापरावेत. घरानजीक तळे असल्यास व तेथील पक्ष्यांचा वावर असल्यास वनविभाग किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी. आजारी किंवा सुस्त पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये, अशी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योग्यप्रकारे शिजवलेले कुक्कुट उत्पादने खाणे सुरक्षित असते. हा विषाणू उष्णतेस संवेदनशील आहे. त्यामुळे योग्य शिजवून खाल्लेल्या चिकनपासून धोका राहत नाही. अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे, असेही नमूद करण्यात आले आहे