लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वृक्षारोपण करून जबाबदारी संपणार नाही, तर त्या वृक्षाचे संगोपन करणे, निगा राखणे आपले कर्तव्य आहे. जलवृक्ष चळवळीच्यावतीने या उद्देशाने शहर व तालुक्यात मागील वर्षी लावण्यात आलेल्या ज्या वृक्षाला एक वर्ष पूर्ण झाले, त्या वृक्षाचा शेणाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर येथे राबविण्यात आला. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेतला.
माहुली धांडे येथील सरपंच सतीश साखरे व गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाला धोका असणाऱ्या नदीचे खोलीकरण केले. त्या जलसंगोपन उपक्रमाला १५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्या नदीत साठवलेल्या जलाचा पण वाढदिवस जलवृक्ष चळवळीच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे.
माणसाचे वाढदिवस सातत्याने होताना दिसतात, पण जलवृक्षचे वाढदिवस कोणीच साजरे करत नाही. म्हणून जलवृक्ष चळवळीच्यावतीने आम्ही दर्यापूर शहरात मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरे करणार आहोत, अशी प्रतिक्रिया येथील पर्यावरणप्रेमी विजय विल्हेकर यांनी दिली.