अमरावती : तालुक्यातील यावली शहीद या राष्ट्रसंतांच्या जन्मस्थानी चौफुलीवर मांसविक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. ही दुकाने बाजारासाठी ग्रामपंचायतीने आखून दिलेल्या ओट्यांवर स्थानांतरित व्हावी, अशी मागणी गुरुदेवप्रेमींनी करताच ३१ ऑगस्ट रोजी काही जणांनी लाठ्या-काठ्या घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यामुळे गुरुदेवप्रेमींची कुचंबणा होत आहे. ग्रामवासीयांनी याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले.
प्राप्त माहितीनुसार, यावली शहीद हे ऐतिहासिक गाव असल्याने सर्व क्षेत्रांचा विकास झाला आहे. हे गाव संसद ग्राम म्हणून गावपातळीवरील पुरस्कार प्राप्त आहे. पर्यटनाचा दर्जा शासनाकडून मिळालेला आहे. गावाच्या दर्शनी भागात असलेल्या अमरावती ते चांदूर बाजार व मोझरी ते परतवाडा चौफुलीवर मांसविक्रीची दुकाने आहेत. या दुकानांसाठी ग्रामपंचायतीने बाजार कंपाऊंडच्या आत विशेष ओटे बांधून दिले आहेत. तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहे. दुकाने येथे स्थानांतरित व्हावी, असा विनंती अर्ज ग्रामपंचायतीला गुरुदेवप्रेमींनी केला. ही बाब माहिती होताच गावातील काही जणांनी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी गांधी चौकात लाठ्याकाठ्या घेऊन शिवीगाळ करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. भगवी टोपी हे राष्ट्रसंतांच्या अनुयायांचे प्रतीकचिन्ह आहे. त्यावरून टोचून बोलले आणि अपमान करणे हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज चौधरी यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
............