अनिल कडू
परतवाडा (अमरावती) - मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. चिखलदरा परिसरात दवबिंदू गोठू लागले आहेत.
चिखलदऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आलाडोह-मोथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खोलगट भागातून वाहणाऱ्या ब्रम्हसती नदीलगतच्या सपाट भागात दवबिंदू गोठत आहेत. याठिकाणी चिखलदऱ्यापेक्षाही अधिक थंडी आहे. पहाटे 4 ते 5 वाजता दरम्यानचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसहूनही कमी होत असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून दवबिंदू या परिसरात गोठत आहेत. यामुळे गवतांवर व झुडपांवर बर्फाचे आच्छादन पसरल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. पहाटे सहानंतर तापमानात वाढ होत असल्याने गोठलेल्या दवबिंदूचे परत पाण्यात रूपांतर होत आहे.
चिखलदऱ्याच्या समकक्ष उंचीवर असलेल्या मध्यप्रदेशातील कुकरू येथेही रात्रीचे तापमान 4 ते 3 डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे. बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यात येत असलेले कुकरू, परतवाडा-धारणी रोडवरील घटांगपासून अवघ्या 6 मैल अंतरावर आहे. या ठिकाणीही शीतलहरने कहर केला आहे. महाराष्ट्रातील चिखलदरा आणि मध्यप्रदेशातील कुकरू येथील वातावरणात बरेच साम्य असले तरी चिखलदऱ्यापेक्षा कुकरूत अधिक थंडी जाणवत आहे. चिखलदऱ्याप्रमाणेच कुकरूतही कॉफीचे वृक्ष आहेत. सन 1906 मध्ये इंग्रजांनी बांधलेले विश्रामगृह तेथे असून ब्रिटिश महिला मि. फ्लोरेंस हेंड्रीक्सने 44 हेक्टर क्षेत्रात, सन 1944 मध्ये हा कॉफीचा बगीचा लावला आहे.
29 डिसेंबरला चिखलदऱ्यात दिवसाचे तापमान 20 डिग्री, तर रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. कुकरूचे दिवसाचे तापमान 19 डिग्री, तर रात्रीचे 4 डिग्री सेल्सिअस दाखवण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलकास आणि सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. मागील दोन दिवसांपासून अंगावर कितीही ब्लँकेट किंवा रजई घेतल्यात तरी ही थंडी थांबत नाही. या थंडीने पर्यटकांसह स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. जर एखाद्याला धडा शिकवायचा असेल तर त्याला पर्यटक म्हणून सेमाडोह-कोलकास येथे या दिवसात मुक्कामी पाठवावे. इतपत या बायटींग कोल्डचा प्रकोप आहे. इंग्रजांनीसुद्धा या बायटींग कोल्डचा उल्लेख केला आहे. दरवर्षी शीतलहर वाढली आणि तापमान घसरले की कोलकास व्हॅलीतील या थंडीचा परिणाम जाणवतो.
चिखलदरा आणि कुकरू पेक्षा कोलकास-सेमाडोह येथील रात्रीचे तापमान अधिक असले तरी चावा घेणारी ही थंडी कोलकास-सेमाडोह परिसरातच आहे. 29 डिसेंबर रोजी कोलकास येथील दिवसाचे तापमान 25 डिग्री सेल्सिअस, तर रात्रीचे तापमान 8 डिग्री सेल्सिअस दाखविण्यात आले आहे. या तापमानातही दिवसभर 11 डिग्री सेल्सिअस तापमानावरील वातावरण राहणार आहे.