अनिल कडू
अमरावती :- मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत मागील चार दिवसांपासून ‘बायटिंग कोल्ड’ने कहर केला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोलकास व सेमाडोह व्हॅलीत पर्यटकांसह वन कर्मचारी, अधिकारी व स्थानिक रहिवासी बोचऱ्या थंडीने चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या बायटिंग कोल्डचा उल्लेख ब्रिटिशांनीदेखील आपल्या दस्तावेजात केला आहे.
कोलकास, सेमाडोह येथील रात्रीचे तापमान ८ अंश सेल्सियस नोंदविले गेले असले तरी प्रत्यक्षात पहाटे ३ ते ५ च्या सुमारास मागील चार दिवसांपासून ५ ते ६ अंश सेल्सियस पेक्षाही कमी असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चिखलदरा ६ अंश सेल्सियस
दरम्यान विदर्भाचे नंदनवन चिखलदराही चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. रात्रीला ६ अंश सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद आहे. मध्यरात्रीनंतर पहाटे ३ ते ५ च्या सुमारास पारा ५ अंश सेल्सियसपर्यंत घसरत असल्याचे सांगितले जात आहे. चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासात, अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर, आलाडोह-मोथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खोलगट भागातून, वाहणाऱ्या ब्रह्मसती नदीलगतच्या सपाट भागात, चिखलदऱ्यापेक्षाही अधिक थंडी अनुभवाला येते. त्या भागात नेहमीच चिखलदरापेक्षा कमी तापमान आढळून येते. बरेचदा या ठिकाणचे तापमान चार डिग्री सेल्सियसपेक्षा कमी जात असल्यामुळे त्या परिसरात दवबिंदूही गोठतात.
कुकरूतही थंडी
चिखलदऱ्याच्या समकक्ष उंचीवर असलेल्या मध्यप्रदेशातील कुकरू येथेही रात्रीच्या तापमानात कमालीची घसरण होत आहे. परतवाडा धारणी मार्गावरील घटांग पासून अवघ्या सहा मैल अंतरावर असलेल्या याठिकाणीही शीतलहरने कहर केला आहे. १९०६ मध्ये इंग्रजांनी बांधलेले विश्रामगृह या ठिकाणी आहे. चिखलदऱ्याप्रमाणेच कॉफीची लागवड या ठिकाणी बघायला मिळते. ब्रिटिश महिला फ्लोरेंस हेन्ड्रीक्सने ४४ हेक्टर क्षेत्रात १९४४ मध्ये ही कॉफीची लागवड केली आहे.