आमदारांवर जबाबदारी : पदवीधर, महापालिका, जि.प. निवडणूकअमरावती : भाजपने विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदारसंघ, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका काबीज करण्याच्या अनुषंगाने विभागात जिल्हानिहाय प्रभारीपदावर नियुक्ती केली आहे. यात प्रामुख्याने आमदारांना प्राधान्य दिले आहे.आ. सुनील देशमुख यांच्याकडे बुलढाणा, आ. अनिल सोले अकोला, आ. चैनसुख संचेती अमरावती, आ. गिरीश व्यास यवतमाळ तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्याकडे वाशीम जिल्ह्याचा प्रभार सोपविण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी नियुक्ती केल्याची माहिती आहे. केंद्र व राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद तुटता कामा नये, यासाठी जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पक्षबांधणी, विविध योजना लोकांपर्यत पोहोचविणे, भाजपची वाटचाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप आदी कामांची जबाबदारी नवनियुक्त प्रभारींवर सोपविण्यात आली आहे. आमदारांकडे विभागात जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्याकडे वाशीम जिल्ह्याची जबाबदारी पक्ष बांधणीसाठी दिल्याची चर्चा सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात सेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे भाजप वाशिम जिल्ह्यात नव्या जोमाने उभी करण्यासाठी कुळकर्णी यांच्याकडे वेगळीे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हा प्रभारींना दर तीन महिन्यात कामाचा आढावा वरिष्ठांकडे सादर करावा लागणार आहे. आ. सुनील देशमुख यांच्याकडे बुलडाणा जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. सुनील देशमुख हे काँग्रेस, राष्ट्रवादी सरकाराच्या कार्यकाळात राज्यमंत्री असताना त्यांचा दांडगा जनसंपर्क भाजपने हेरण्याचा प्रयत्न केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही भाजप ताकदिनिशी उभी करण्यासाठी आ. देशमुखांना प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आ. चैनसुख संचेती हे यापूर्वीदेखील अमरावती जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत होते. विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाची गत निवडणूक आ. संचेती यांच्या मोर्चेबांधणीमुळेच भाजपला जिंकता आली होती, हे विशेष. आता भाजपने आ. चैनसुख संचेती यांच्याकडे अमरावती जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली.
भाजपचे नवे जिल्हा प्रभारी नियुक्त
By admin | Published: May 11, 2016 12:34 AM