अमरावती : चंद्रयान-३ मोहीम यशस्वी करुन भारताने जगाच्या पाठीवर सुवर्णाक्षराने या दिवसाची नोंद केली. परंतु या मोहिमेचे श्रेय घेणाऱ्य भाजपवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, तुम्ही इस्रो स्थापन करुन झापले होतात. चंद्रयानसाठी मोदींनाच यावे लागले. मोदींनी सर्व शास्त्रज्ञांची टीम एकत्र आणून त्यांना प्रोत्साहन दिल्याने ही मोहिम यशस्वी झाल्याचा एक प्रकारचा चंद्रयान यशावर आपला दावाच बावनकुळे यांनी शुक्रवारी अमरावतीत केला.
भाजपच्या वतीने आगामी २०२४ लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने लोकसभा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील २८ लोकसभा मतदार संघामध्ये दौरा करणार आहेत. या अभियानाची सुरुवात त्यांनी विदर्भातून केली असून शुक्रवारी ते या अभियानाच्या निमित्ताने अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आगामी लोकसभेच्या निवडणूकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून लोकसभेत राज्यात ४५ प्लस तर विधानसभा निवडणूकीत २०० प्लस आकडा गाठणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच लवकरच शरद पवार हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्विकारणार असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी केले. याच वेळी सध्या जगभरात भारताचा डंखा ताचा डंखा वाजत असलेल्या चंद्रयान -३ मोहिमेवर बोलतांना बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
बावनकुळे म्हणाले इस्रो जरी विरोधकांनी स्थापन केली असेल परंतु चंद्रयानासाठी मोदींनाच यावे लागले. फक्त संस्थाकाडून उपयोग नाही, त्यांना पाठबळ द्यावं लागत. पोखरण परमाणू परीक्षणासाठीही अनेक प्रधानमंत्र्याकडे परवानगी मागूणही ती मिळाली नाही. त्यासाठीही अटलजींना यावे लागल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले. चंद्रयानसाठी मोदींनी शास्त्रज्ञांची टीम एकत्र करुन सर्व शास्त्रज्ञ एकत्र केले आणि त्यांनी मग या टीमला प्रोत्साहन दिल्यानेच चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी भापर प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, खासदार डॉ. अनिल बोंडे, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, निवेदिता चौधरी, तुषार भारतीय उपस्थित होते.