अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक खांदेपालट केला आहे. यामध्ये शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार प्रवीण पोटे व जिल्हाध्यक्ष ग्रामीण पदाची खा. अनिल बोंडे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सकाळी याविषयी घोषणा केलेली आहे.
शहराध्यक्ष किरण पातूरकर व जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या पदांची धुरा कुणाच्या खांद्यावर?, याविषयीची चर्चा चार महिन्यांपासून सुरु होती, यामध्ये दोन्ही पदांसाठी वेगवेगळी नावे चर्चेत असतांना प्रदेशाध्यक्षांनी धक्का दिला आहे.
आगामी वर्ष-दोन वर्षांचा कालखंड हा निवडणुकांचा असल्याने नव्या अध्यक्षद्वयींसमोर आव्हानात्मक काळ आहे. यामध्ये विधानसभा, लोकसभा व्यतिरिक्त पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. यामध्ये पक्षाला बहुमत मिळवून देण्याचे कसब यांना दाखवावे लागेल. दरम्यान जिल्ह्यात या नियुक्तीचे भाजप गोटात स्वागत करण्यात येत आहे.