अमरावती : भाजपने येत्या २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी चालविली आहे. गाव ते शहर अशी ‘टॉप टू बॉटम’ कार्यकर्त्यांची फळी सुसज्ज करण्याची रनणीती आखली आहे. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. ८) लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत. यात अमरावती विधानसोसाठी आमदार प्रवीण पोटे-पाटील, तर लोकसभेसाठी जयंत डेहनकर यांची वर्णी लागली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी भाजपने सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता लोकसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांच्याकडेही पक्षबांधणीसह उमेदवार चाचपणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघाची धुरा आमदार प्रवीण पोेटे-पाटील यांच्याकडे असेल. तर धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जगदीश रोठे, बडनेरा किरण पातुरकर, तिवसा राजेश वानखडे, दर्यापूर गोपाल चंदन, मेळघाट प्रभुदास भिलावेकर, अचलपूर प्रवीण तायडे, मोर्शी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी डॉ. मोहन आंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.