Nitin Gadkari Speech ( Marathi News ) : राज्यासह राष्ट्रीय पातळीवरीलही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा टीकेचे बाण सोडले जातात. मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात शरद पवारांवर जोरदार स्तुतीसुमने उधळली आहेत. "विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभं राहणारं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार," अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी शरद पवारांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
नितीन गडकरी आणि शरद पवार हे महाराष्ट्रातील दोन्हीही नेते आपल्या पक्षविरहीत मैत्रीसाठी ओळखले जातात. गडकरी आणि पवार आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने १२५ रुपयाचे नाणे जारी केले. या नाण्याचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच यावेळी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यावेळी नितीन गडकरी यांनी शरद पवारांचं कौतुक करत या पुरस्कारासाठी पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठून मिळणार, असं म्हटलं आहे. "पंजाबराव देशमुख यांच्याकडे असणारी तळमळ आणि व्हिजन शरद पवार यांच्याकडेही आहे. राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचं नाव व कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहतं," असं गडकरी म्हणाले.
दरम्यान, राज्यात अजित पवार यांनी आपल्या सहकारी आमदारांसह भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार यांनी भाजपच्या विचारधारेला विरोध असल्याचं सांगत इंडिया आघाडीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या विविध नेत्यांकडून शरद पवारांवर शाब्दिक हल्ला केला जात असतानाच आज नितीन गडकरी यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळल्याने अमरावतीतील या कार्यक्रमाची राज्यभर चर्चा होत आहे.