नगर विकास मंत्रालयाचे आदेश;
न.प.च्या सत्ताधार्यांना झटका
चांदूर बाजार नगर परिषद
चांदूर बाजार : स्थानिक नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे अतुल रघुवंशी कायम ठेवण्याचा निर्वाळा नगर विकास मंत्रालयाने आदेशातून दिला. त्यांच्याविरुद्ध दाखल अपिलावर १६ सप्टेंबरला हा निर्णय आला आहे.
नगर परिषदेत ७ डिसेंबर २०१९ ला अतुल रघुवंशी हे उपाध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांच्या निवडीला त्यांचे प्रतिस्पर्धी आबिद हुसेन यांनी आव्हान दिले होते. याशिवाय आनंद अहीर व विजय दिवेकर हेही रिंगणात होते. रघुवंशी यांना १० मते, आबिद हुसेन यांना ६ मते, तर इतर दोघांना शून्य मते प्राप्त झाली होती. या निवडीनंतर हुसेन यांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ५१-अ(५) अन्वये शासनाकडे अपील दाखल केले. अतुल रघुवंशी हे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी नगर परिषदेच्या इतर दोन समित्यांचे सदस्य होते. त्यामुळे ते उमेदवारी दाखल करण्यास पात्र नाहीत, असे त्यात नमूद होते. १६ डिसेंबर २०१९ रोजी नगर विकास मंत्रालयाने अतुल रघुवंशी यांच्या निवडीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली होती. परंतु, रघुवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदरच दोन्ही समित्यांचा राजीनामा मंजूर करून घेतला होता. या अपिलाची सुनावणी २४ जून २०२१ ला व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे पार पाडली. अपिलातील मुद्दे खारीज झाल्याचे नगर विकास मंत्रालयाने स्पष्ट केले. या निवडीला दिलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. सत्याचा विजय निश्चित होतो, अशी प्रतिक्रिया अतुल रघुवंशी यांनी व्यक्त केली.