बाजारपेठ सुरूच : शासकीय कार्यक्रमातील गोंधळाचे प्रकरण तिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे पुलाच्या भुमिपूजनाच्या शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे लावल्याने युकाँच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर उदभवलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने सोमवारी तिवसा बंदचे आवाहन केले होते. मात्र, भाजपच्या या बंदकडे नागरिक व व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने या बंदचा फज्जा उडाला. वास्तविक सोमवारी तिवसा येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा शिरस्ता आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी भाजपने शासकीय कार्यक्रमात घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ सोमवारीही बाजारपेठ सुरू ठेवली.तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील बदबदा नाल्यावरील पुलासाठी ८० लाखांच्या निधीतून पूलाचे बांधकाम करण्यात येणार होते. त्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह या भागाच्या आमदार यशोमती ठाकूर आमंत्रित होत्या. मात्र, कार्यक्रमस्थळी भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले पाहून युकाँचे कार्यकर्ते बिथरले. शासकीय कार्यक्रमात पक्षीय झेंड्यांची गरज नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. बाजारपेठ सुरूच राहिलीतिवसा : यावरून भारतीय जनता पक्ष व युकाँच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. भाजपचा एक कार्यकर्ता या गोंधळादरम्यान जखमी झाल्याने प्रकरण चिघळले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले होते. यानंतर पालकमंत्री प्रवीण पोटे कार्यक्रमस्थळी पोहोचलेच नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत पूलाचे भूमिपूजन पार पडले. यानंतर भारतीय जनता पक्षाने तिवसा बंदचे आवाहन केले होते. मात्र,व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा अधिकृत दिवस सोमवार असूनही या दिवशी सुद्धा बाजारपेठ सुरू ठेऊन भारतीय जनता पक्षाचाच निषेध नोंदविला. त्यामुळे भाजपच्या या बंदचा तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे चित्र होते. (तालुका प्रतिनिधी)
तिवस्यात भाजपच्या ‘बंद’चा फज्जा
By admin | Published: November 15, 2016 12:08 AM