वरूड : नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे देवेंद्र बोडखे यांची मंगळवारी अविरोध निवड करण्यात आली. २३ मार्च रोजी त्यासाठी विशेष सभा घेण्यात आली.
नगर परिषदेच्या १२ मार्च रोजी विशेष सभेत उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव ४ विरुद्ध १८ मतांनी पारित होऊन उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. वरूड नगर परिषदेमध्ये भाजप १६, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, प्रहार १ आणि वरूड विकास आघाडी १ असे २४ सदस्य आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे यांना घरचा आहेर देऊन अविश्वास प्रस्ताव पाठविला, तर ११ भाजप नगरसेवकांनी सात विरोधी गटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांना पायउतार केले होते. यामुळे उपाध्यक्षपदासाठी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष स्वाती आंडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी नामनिर्देशन सुरू केले. यावेळी भाजपचे देवेंद्र बोडखे यांचे एकमेव नाव पुढे आल्याने अविरोध निवड झाली