वरूड : तालुक्यात १६ मे रोजी आलेल्या वादळाने नुकसान झेलणाऱ्या आमनेर, ढगा, चांदस व सुरळी येथील ग्रामस्थांना नुकसानभरपाई मंजूर करावी, या मागणीसाठी भाजपने ठिय्या आंदोलन केले.
वादळामुळे आमनेर, ढगा, चांदस व सुरळी या चारही गावांतील वीज गूल झाली. घराची पत्रे उडून जाणे, भिंती पडणे अशा प्रकारचे नुकसान झाले. वादळाची तीव्रता अधिक असल्यामुळे घरांचे १००टक्के नुकसान झाले व बाधित कुटुंबे उघड्यावर आली. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, तहसीलदार, तलाठी यांनी पाहणी केली, पंचनामे केले. परंतु, २० दिवस होऊनसुद्धा शासनाची कोणतीही मदत या कुटुंबांना मिळाली नाही. या मुद्द्यावर मंगळवारी वरूड तहसील कार्यालयात भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला. तहसीलदारांकडे भरपाईच्या मागणीचे निवदेन देण्यात आले. बाधित कुटुंबांना तातडीची मदत व घर बांधण्याकरिता अनुदान न दिल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा राजकुमार राऊत यांनी दिला. याप्रसंगी शहराध्यक्ष डॉ. नीलेश बेलसरे, शेंदूरजनाघाट शहराध्यक्ष नीलेश फुटाने, युवा मोर्चा शहराध्यक्ष नितीन गुर्जर, सरचिटणीस दिलीप ढोमणे, उपाध्यक्ष यशपाल राऊत, दीपक कोचर, नगरसेवक राजू सुपले, राजेंद्र काळे, शंकर वाघ, अंकुश घोड्साडे, संगीता मांडोकर, होमराज बोडखे, सुरेश चातरकर, रेखा बालपांडे, सुमन मोरे, धनराज ठोंबरे, महादेव ठाकरे, बेबी ठोसर, शिवाजी धोटे, प्रमिला उईके, रमेश शेलू, किसना सोनोने आदी उपस्थित होते.