अमरावती: महापालिकेच्या पाच संकुलासह मुख्य इमारतीमधील एका बँकेचे भाडेवाढ व मालमत्तेच्या नूतनीकरणाच्या मुद्द्यावर ऐनवेळी सत्ताधारी भाजपने माघार घेत विषय स्थगित ठेवला. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. दोन्ही बाकांवरून शाब्दिक वार झाले. सभागृहाचा आखाडा होणार की काय, अशी स्थिती शुक्रवारच्या आमसभेत निर्माण झाली होती.
या विषयावर बहुतांश सदस्यांनी मत व्यक्त केल्यावर सभागृहनेते तुषार भारतीय यांनी समितीच्या अहवालात काही मुद्दे स्पष्ट नसल्यामुळे विषय स्थगित ठेवण्यात येऊन यावर शासनाचे मार्गदर्शन मागविण्याची सूचना केली. त्यामुळे सभागृहात अचानक गदारोळाला सुरुवात झाली. विरोधकांसह सत्तापक्षाचे काही सदस्य व सहयोगी सदस्यांनी देखील विंगमध्ये धाव घेतल्याने गहजब उडाला.
महापालिकेची सप्टेंबर महिन्याची आमसभा शुक्रवारी आयोजित होती. यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रशासनाद्वारा हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या विषयावर काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आदी सदस्यांसह भाजपच्या बहुतांश सदस्यांनी यासाठी जोरकसपणे मांडणी केली. याशिवाय भाजपचे तीन व बसपाच्या एका सदस्यांनी विरोध दर्शवित व्यापाऱ्यांच्या बाजूने काही मुद्दे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
आपाद्स्थितीत महापालिकेची वाहने डिझेलअभावी उभे राहत असताना लीज संपलेल्या व्यापारी संकुलातील १२ कोटींचे भाडे वसूल झाले नसल्याची खंत ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी व्यक्त केली. उत्पन्नवाढीचा विषय महत्त्वाचे असल्याने असे न झाल्यास अमरावतीकरांना तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, असे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी सभापतींना म्हणाले. या चर्चेत शिवसेनेचे गटनेते राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे, एमआयएमचे अब्दुल नाझिम, मिलिंद चिमोटे, बलदेव बजाज, श्रीचंद तेजवानी, प्रणीत सोनी, ऋषी खत्री, अजय गोंडाणे, प्रकाश बनसोड, धीरज हिवसे, नीलिमा काळे आदींनी सहभाग घेतला.
बॉक्स
या संकुलाच्या भाडेवाढीवरून गदारोळ
महापालिकेच्या दादासाहेब खापर्डे व्यापारी संकुल, प्रियदर्शनी व्यापारी संकुल, सूरज बिल्डर व्यापारी संकुल, बडनेरा येथील महात्मा गांधी व्यापारी संकुल, जवाहर गेट व्यापारी संकुल व मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पंजाब नॅशनल बँक यांचा लीज कालावधी तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आलेला आहे. यांच्या भाडेवाढीच्या मुद्द्यावर आजची आमसभा चांगलीच गाजली.
बॉक्स
विरोधकांद्वारे मतदानाची मागणी, गोंधळातच विषय तहकूब
सभागृह नेता तुषार भारतीय यांच्या सूचनेनंतर चित्र स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी यावर मतदानाची मागणी केली. हा गोंधळ व गदारोळ सुरू असतानाच सभापती चेतन गावंडे यांनी विषय स्थगित ठेवण्यात येत आहे, याविषयी सदस्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचे रुलिंग दिले. त्यानंतर सभा स्थगित करण्यात आली.
कोट
हा विषय स्थगित करण्यात येणार असल्याची गुरुवारपासून चर्चा ऐकू येत आहे. सत्ताधाऱ्यांनी यामध्ये काही व्यवहार केल्याची शंका आहे, कुठेतरी पाणी मुरत आहे. हा विषय मंजूर करणे बंधनकारक आहे.
बबलू शेखावत
विरोधी पक्षनेता
कोट
यामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यासाठी रेडिरेकनरचे दर नाहीत, बीओटी व नॉनबीओटीचा खुलासा नाही. यासह काही मुद्द्यांवर शासनाचे मार्गदर्शन मागविण्याची सूचना केली. विरोधक व्यापाऱ्यांना फसवित आहेत.
तुषार भारतीय
सभागृह नेता