प्रहारद्वारे पोलिसांचा निषेध : प्रतिकात्मक वृक्षारोपणचांदूरबाजार : आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर वृक्षलागवड करून व काळे झेंडे दाखवून पोलीस विभागाचा निषेध नोंदविण्यात आला. काही दिवसांपूर्वी खरवाडी येथे घडलेल्या अपघातात किशोर इंगळे यांचे कुटुंब ठार झाले. या अपघाताला हफ्तेखोर ग्रामीण पोलीस व चांदूरबाजारचे ठाणेदारच जबाबदार आहेत. त्यामुळे या दोघांवरही मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, यासाठी ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनी हे निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रहार कार्यालयामधून स्वत: आ. बच्चू कडू व त्यांचे शेकडो कार्यकर्ते निषेधाचे काळे झेंडे घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते. हा निषेध मोर्चा शिवाजी चौक मार्गे शांततेने पोलीस स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ झाला. पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर या मोर्चाने पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षलागवडीची परवानगी न मिळाल्याने ठाण्याच्या तीनही बाजूला बाहेरून ४० वृक्षांची लागवड केली. तसेच पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी न करता काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. प्रहारच्या या आधीच्या विविध आंदोलनाचा एकूणच धसका पोलीस विभागाने घेतलेला आहे. त्या पार्श्वभूमिवर पोलीस विभागाकडून प्रहारच्या साध्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. प्रहारच्या आंदोलनासह पोलीस प्रशासनाने बोलविल्या तगड्या बंदोबस्तामुळे शहरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. पोलीस स्टेशन समोरच आ. बच्चू कडू यांनी निषेध सभा घेतली. या सभेत शहीदांना व किशोर इंगळे कुटुंबियांना मूक श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चात अंकुश जवंजायळ, श्रीकांत धोंडे, गणेश पुरोहित, पवन वाठ, मंगेश देशमुख, विनोद जवंजाळ, प्रदीप बंड, सचिन खुळे, विशाल बंड, सचिन पिसे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)प्रहारच्या वृक्षारोपण आंदोलनासाठी पोलीस विभागाकडून तगडा बंदोबस्त होता. खरवाडीच्या घटनेला पोलीस अधीक्षक व येथील ठाणेदारच जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.- बच्चू कडू, आमदार, अचलपूर
आॅगस्ट क्रांतिदिनी दाखविले काळे झेंडे!
By admin | Published: August 09, 2016 11:58 PM