पान २ ची लिड
बागा तोडाव्यात का? शेतकरी हवालदिल, कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना
मोर्शी/वरूड : संत्राबागांवर काही दिवासांपूर्वी बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसला. आता संत्राबागांवर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील चार ते पाच गावांत हा रोग आढळून आला असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी कोळशीचा प्रादुर्भाव झाला होता. यात अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड तालुक्यांतील निम्म्याहून अधिक संत्राबागा शेतकऱ्यांनी तोडल्या होत्या. राज्याच्या तुलनेत ७५ टक्के संत्रा उत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यात होते. त्यातील सर्वाधिक उत्पादन या पाच तालुक्यांत घेण्यात येते. जिल्ह्यात संत्रा फळपिकावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याअनुषंगाने संत्रा फळपिकांवरील काळी माशीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाव्दारे उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
दरम्यान ३० वर्षांनंतर या बुरशीजन्य रोगाने डोके वर काढले असून वरूड, तिवसाघाट, रवाळा आदी गावांमध्ये संत्रापिकांवर बुरशीसोबत कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. हा रोग संत्रा उत्पादन पट्ट्यात पसरल्यास बागांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात संत्राबागांमधील झाडांना हस्त बहराची नवीन नवती फुटलेली आहे. या नवती व मध्यम परिपक्व पानांवर रस शोषण करणाऱ्या काळी माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. काळी माशींचे प्रौढ व पिलं कोवळ्या पानांतील अन्नरस शोषण करतात व शरीरातून मधासारख चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात व त्यावर काळ्या बुरशीची पानांवरती झपाट्याने वाढ होते. या बुरशीमुळे संपूर्ण बाग काळीशार दिसते यालाच कोळशी असे म्हणतात. कोळशीमुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. किडीव्दारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात व पुढील बहरात फळधारणा कमी होते. सद्यस्थितीत काळया माशींचे प्रौढ व अंडी पानांच्या खालच्या बाजूस आढळून आलेली आहेत.
अशी करा फवारणी
या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी ईमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल, ०.५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्लूजी ०.३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रौढ उत्पत्ती व ५० टक्के अंडी उबण्याच्या स्थिती ही फवारणीकरिता योग्य वेळ असते. कारण या अवधित किडीच्या प्रथमावस्था झाडांवर उपलब्ध असतात. कोळशी (काळी बुरशी) या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ०.३ टक्के ३ ग्रॅम प्रतीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कोट
जिल्ह्यात संत्रा फळपिकावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. रासायनिक औषधांची फवारणी करून काळ्या माशीचा प्रादुर्भाव रोखता येतो. त्यामुळे सुचविलेली उपाययोजना शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा बगीच्यात करावी.
- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी