अमरावती : कोरोनामुळे त्रस्त असतानाच त्यात पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराच्या २८९ रुग्णांची नोंद झाली. ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आजाराचे १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे.
कोरोनामध्ये गंभीर संसर्ग झालेल्या व स्टेराॅइडचे इंजेक्शनचा वापर जास्त झालेले तसेच मधुमेहासारख्या आजाराने ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचा शिरकाव झालेला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूवरून परतलेल्या रुग्णांना या आजाराचा जास्त धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या रोज एक किंवा एक दिवसाआड एक तरी रुग्ण या आजाराच्या उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती नाक-कान-घसातज्ज्ञ व नेत्रतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘म्युकरमायकोसिस’ या आजारावरील उपचार महागडा आहे. यावरील औषधांचा सध्या तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाचे यावर नियंत्रण आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाच सदस्यीय समिती गठित केली. उपचारासाठी इंजेक्शनचा साठा जिल्हा सामान्य रुग्णालयात येतो व ज्या रुग्णालयात रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत, त्या रुग्णालयाद्वारे रक्कम जमा केल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळतात. याशिवाय शासकीय रुग्णालयात या आजारावर मोफत उपचार असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. दरम्यान बुधवारपर्यंत आशा सेविकांद्वारा जिल्हा जनजागृती करण्यात येणार आहे.
पाॅइंटर
म्युकरमायकोसिसची जिल्हा स्थिती
नवे रुग्ण : १८६
उपचार सुरू : १०३
एकूण मृत्यू : ११
आतापर्यंत डिस्चार्ज : ७२
बॉक्स
ही आहेत आजाराची लक्षणे
डोळ्यांच्या आसपास, डोक्याचा समोरचा भाग, गालावर दुखणे, अनेकदा नाकातून काळा स्राव, चेहऱ्यावर लालसरपणा व सूज येणे ही सामान्य लक्षणे आहेत. यासह ताप येणे, उलट्या होणे, धूसर दिसणे किंवा अंधत्वासारखे परिणामही दिसून येतात. चेहरा व डोक्याचे सायनस सुजण्याची शक्यता व दुखणेही असू शकत असल्याची माहिती नाक, कान, घसा व नेत्रतज्ज्ञांनी दिली.
कोट
जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत १२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ३० वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अडीच महिन्यांपासूनचे रुग्ण औषधोपचारासाठी येतात.
-डॉ. श्रीकांत महल्ले, नाक-कान-घसातज्ज्ञ, इर्विन हॉस्पिटल