लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘ब्लड मून’, ‘सुपर मून’, ‘ब्ल्यू मून’ ऐकलेले असेलच, आता ‘ब्लॅक मून’ ही संकल्पना समोर आली असून, ३० ऑगस्ट रोजी ही घटना देशवासीयांना अनुभवता येणार आहे.‘ब्लॅक मून’ अर्थात काळा चंद्र म्हणजे अमावस्या. परंतु, काळा चंद्र म्हणून पात्र होण्यासाठी महिन्यातील दुसरी अमावस्या असावी लागते. जेव्हा इंग्रजी महिन्यात दोन अमावस्या येतात तेव्हा दुसऱ्या अमावस्येच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ म्हणण्याचा प्रघात आहे.चंद्र हा पृथ्वीमोवती २७.५ दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. परंतु, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचे व एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंतचे अंतर हे २९.५ दिवसांचे असते. त्यामुळे इंग्रजी महिना ३१ दिवसांचा असेल व पहिली अमावस्या १ तारखेला आली असेल, तर दुसरी अमावस्या ही ३० तारखेला येते. अशा तºहेने एका महिन्यात दोन अमावस्या येतात. याचप्रमाणे दोन पौर्णिमाही येतात. जेव्हा इंग्रजी कॅलेंडरच्या एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते. अमावस्येला सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागे असतो. अंधारी बाजू पृथ्वीकडे असते. ३० ऑगस्टला उगाचच काळा चंद्र शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती येथील खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.नवीन प्रघात‘ब्लॅक मून’ म्हणण्याचा प्रघात अलीकडे पडला आहे. यापूर्वी ही घटना ३० जुलै२०११, ३० जानेवारी २०१४ व ३० जानेवारी २०१६ मध्ये घडली. आता यापुढे हा योग ३० मे २०२२ ला येणार आहे. अशा घटना आल्या की, वेगवेगळया अफवा समाजात पसरविल्या जातात. तथापि, अशा कोणत्याच घटनेचा परिणाम पृथ्वीवर तथा मानवी जीवनावर होत नसतो. ३० ऑगस्टचा चंद्र नेहमीसारखाच असेल. यावेळी चंद्रामध्ये कोणताच बदल होणार नाही. सूर्यग्रहणाची स्थिती वगळता, अमावस्येचा कोणताच चंद्र आपणाला दिसत नाही.
३० ऑगस्टला ‘ब्लॅक मून’चा योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 7:00 AM
जेव्हा इंग्रजी महिन्यात दोन अमावस्या येतात तेव्हा दुसऱ्या अमावस्येच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ म्हणण्याचा प्रघात आहे.
ठळक मुद्देमहिन्यातील दुसरी अमावस्या मराठी विज्ञान परिषदेची माहिती