अमरावती : भल्याभल्यांची भंबेरी उडविणारे काळे उंदीर भारतातूनच समुद्रमार्गे जगभरात पसरले आहेत. विशेष म्हणजे, सिंधू संस्कृतीच्या काळापासून व्यापारी मालाच्या जहाजातून त्यांचा प्रवास झाला आहे. जगभरातील काळ्या उंदिरांच्या डीएनए संशोधनातून ही बाब अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी पुढे आणली आहे.
‘काळ्या उंदरांचा उगम व प्रसार’ या विषयावरील शोधनिबंधात प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी सदर नोंदी घेतल्या आहेत. हा शोधनिबंध स्वित्झर्लंड येथील स्प्रिंगर नेचर पब्लिकेशन हाऊसच्या बायोलॉजिकल इन्व्हिेशन या प्रतिष्ठित त्रैमासिकात सप्टेंबर 2018 मध्ये प्रसिद्ध झाला. जागतिक पातळीवर चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या कार्नेल विद्यापीठात ते 2015 मध्ये संशोधनाकरिता भारत सरकारची फेलोशिप मिळवून दाखल झाले होते. त्यानंतर तेथील संशोधक प्रा.डॉ. जेरेमी सिअर्ल यांच्या सहकार्याने त्यांनी संशोधन पूर्ण केले. शोधप्रबंधानुसार, भारतात मुख्यत: दोन प्रकाराचे उंदीर आढळतात. एका सहज आढळणाऱ्या प्रजातीत 38 गुणसूत्रे आणि दुसऱ्या कमी आढळणाऱ्या प्रजातीत 42 गुणसूत्रे आहेत. ते गंगा नदी व पूर्वेकडील भागात आढळतात. ते 38 गुणसूत्रे असलेल्या उंदरांचे पूर्वज आहेत. आठ हजार वर्षांपूर्वी भारतातील उपखंडातील उत्तर पश्चिम भागात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली. याच भागात अतिप्राचीन समृद्ध हडप्पा, सिंधू संस्कृती उदयास आली व तेथील उत्पादने मेसोपोटेमियासह जगाच्या विविध भागांत व्यापारमार्गे पोहोचली. त्यासोबतच संस्कृतीचे आदान-प्रदान झाले आणि महत्त्वाचे म्हणजे भारतातील काळ्या उंदरांनी या भागात प्रवेश घेतला. तेथेदेखील त्यांनी हवामानाशी जुळवून घेतले. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषात आढळलेले उंदरांचे नमुने आणि त्यांचे विविध देशांत पसरलेले वंशज यांच्या डीएनए चाचणीतून त्यांची वंशावळ एकच असल्याचे प्रा.डॉ. मुमताज बेग व प्रा.डॉ. जेरेमी सिअर्ल यांनी सिद्ध केले.
जहाजातून देशभरात पोहचले उंदीरव्यापारासाठी होणाºया जहाजाच्या वाहतुकीतून काळे उंदीर हे भारतातून आग्नेय आशिया, अरब द्वीपकल्प (ओमान), अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भूमध्य सागरी प्रदेशातील फ्रान्स, इटली आणि अल्बेरीयन प्रदेश (स्पेन, पोर्तुगल) येथे पोहोचले. पंधराव्या शतकात भारताला भेट देऊन परतणाºया युरोपीयनांच्या जहाजातून उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपातील इतर भागांत काळे उंदीर पोहोचले.
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने संशोधन पूर्ण झाले. जगभरात दिसणारे काळे उंदीर भारतातूनच तेथे दाखल झाले आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेत आपले अस्तित्व दाखवित आहेत. प्रा. डॉ. जेरेमी सिअर्ल, संस्थेचे संचालक डॉ. एस.जी. गुप्ता यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.- प्रा.डॉ. मुमताज बेग, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती