लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘ब्लॅक विंग स्टिल्ट’ म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे. हा पक्षी ऑस्ट्रेलियातून गुजरातच्या किनारपट्टीवर विदर्भ, मध्य भारतातून स्थलांतर करतो.शेकाट्या हा पांढरा शुभ्र रंग, त्यावर काळ्या रंगाचे पंख, लांब टोकदार काळी चोच आणि शरीराच्या मानाने सर्वांत लांब पाय असलेला पक्षी सर्वांच्या परिचयाचा आहे. या पक्ष्यांच्या मानेचा रंग संपूर्ण पांढरा असतो. तलावांच्या काठाने, घाण पाण्याचे डबके आणि नदी-नाल्यातसुद्धा हे पक्षी थव्याने दिसतात. काही वर्षांपासून पक्ष्यांच्या उपप्रजातींचा आणि त्यांच्यातील रंगबदल आणि वेगळेपणाचा अभ्यास करणारे निनाद अभंग यांना ३० मार्च २०१४ रोजी काही शेकाट्या पक्ष्यांच्या मानेवर काळ्या रंगाचा पट्टा आढळला. प्रथमदर्शनी हा पिसांच्या रंगातील बदल असावा, असे वाटले. त्यावेळी उपलब्ध संदर्भ आणि माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये शेकाट्याची एक उपप्रजाती अशी दिसत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर दरवर्षी केलेल्या निरीक्षणाअंती २०१५ मध्ये पक्षी अभ्यासक जयंत वडतकर यांना अमरावती व जानेवारी २०१६ मध्ये शिशिर शेंडोकर यांना अकोला येथे हेच पक्षी आढळून आलेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सहायक संचालक राजू कसंबे यांना ही प्रजाती ठाणे जिल्ह्यात २०१६ आणि २०१७ च्या हिवाळ्यात आढळून आली होती. मानेवर काळा रंग असलेला हा पक्षी प्रथम ‘ब्लॅक विंग स्टील्ट’ची उपप्रजाती म्हणून गणला गेला. आता ती स्वतंत्र प्रजाती समजली जाते.गुजरात येथील बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीचे दीक्षांत पाराशर्या आणि श्रीलंकेतील रेक्स डिसिल्वा यांनी हे पक्षी ऑस्ट्रेलियन शेकाट्या असल्याचे कळविले. ऑस्ट्रेलियन शेकाट्याची श्रीलंकामध्ये नियमित नोंदी असून, भारतात गुजरातच्या किनाऱ्यावर या प्रजातीचे पक्षी नोंदविले गेले आहेत.पक्ष्याच्या मानेवारील काळ्या पिसांचा पट्टा दिसल्यापासून या प्रजातीवर सातत्याने लक्ष ठेवून होतो. आशियातील पक्षीविषयक पुस्तकांमध्ये त्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. अलीकडे काही नवीन संदर्भामुळे या प्रजातीला वेगळे सिद्ध करणे सोपे झाले.- निनाद अभंग, पक्षी अभ्यासक.ऑस्ट्रेलियन स्टील्ट ही शेकाट्याची प्रजाती श्रीलंकेत नियमित येत असते. गुजरात किनाऱ्यावर या प्रजातीची नोंद झालेली आहे. मध्य भारतातील नोंदीमुळे राज्यातील पक्ष्यांच्या जैवविविधतेत भर पडली आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील चिल्का लेक आणि तेथून गुजरात असा या पक्षाच्या प्रवासाचा मार्ग विदर्भातून जातो, याबाबत आनंद आहे.- जयंत वडतकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ
ऑस्ट्रेलियन शेकाट्याचा विदर्भातून प्रवास; महाराष्ट्रात प्रथमच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:57 PM
‘ब्लॅक विंग स्टिल्ट’ म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे.
ठळक मुद्देगुजरातेत वास्तव्यअमरावती, अकोल्यात तलावाच्या काठावर आढळले थवे