अमरावती : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात रोज हादरे देत आहेत. शनिवारी २,१३१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, पुन्हा उच्चांकी ७२७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २८,११६ वर पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सर्वच तालुक्यांत उपचार केंद्रे सुरू झाली व नागरिकांना स्वॅब देण्याचे सोईचे व्हावे, यासाठी स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले आहे. शासनस्तरावरदेखील अमरावती जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शासनाचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांद्वारेही नियमित व्हीसीद्वारे आढावा घेण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पथकांद्वारे दंडनीय कारवाया केल्या जात आहेत. याद्वारे आतापर्यंत १० लाखांवर महसूल जमा झालेला आहे.
बॉक्स
रविवारी लॉकडाऊन
कोरोनाची संसर्गाला ब्रेक लागावा, यासाठी शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू घोषित केलेला आहे. त्यामुळे रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक व वैद्यकीय सेवांना यामधून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात पोलीस पथकांचा चौकाचौकांत वॉच राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
बॉक्स
महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित
शासनाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात पुन्हा कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी महापालिका प्रशासनाद्वारे श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लॉट, महाजनपुरा, एलआयसी कॉलनी, भाजीबाजार, अनुराधानगर (सद्गुरू धाम कॉलनीजवळ), चंद्रावती नगर (महेशनगरजवळ), उषा कॉलनी, भारत नगर (द्वारकानगरजवळ), साईनगर, खंडेश्वर कॉलनी, गोकुळ (उदय कॉलनीजवळ) हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
-------------
पॉईंटर
१३ फेब्रुवारी : ३७६
१४ फेब्रुवारी : ३९९
१५ फेब्रुवारी : ४४९
१६ फेब्रुवारी : ४८५
१७ फेब्रुवारी : ४९८
१८ फेब्रुवारी : ५९७
१९ फेब्रुवारी : ५९८
२० फेब्रुवारी : ७२७