अमरावती - दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी कारवायांसह मानवनिर्मित आपत्तीमध्ये जखमी होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा आपत्तीग्रस्तांना मदत देताना सुधारित निकष, दर लागू करण्यात आले असून, नव्या नियमानुसार ते दिले जातील. ही बाब राज्याच्या महसूल व वनविभागाने स्पष्ट केली आहे.
शासनाने २४ आॅगस्ट २००४ आणि १ डिसेंबर २००८ च्या निर्णयानुसार दहशतवाद व दंगलग्रस्त आपत्तीग्रस्तांना मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतची योजना अंमलात आणली होती. अशा घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना मालमत्ता नुकसानीसंदर्भात द्यावयाच्या मदतीचे दर सुधारित करण्याचे विचाराधीन होते. नव्या निकषात बॉम्बस्फोट आणि नक्षलवादी कारवायांमध्ये जखमी झालेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी अशा चारही प्रकारांतील कारवायांमध्ये जखमींना शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. रूग्णालयात दाखल असलेल्या जखमींना ३ दिवसांच्या कालावधीपर्यंत किमान ३ हजार रूपये, ३ दिवसांपुढील प्रत्येक दिवसांकरिता एक हजार रूपये, तर अधिक १४ दिवसांसाठी १४ हजार रूपयांची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या असणार अटी, शर्ती
मानवनिर्मित कारवायांमध्ये जखमींना मदत मिळण्यासाठी काही अटी, शर्तीचे बंधन लागू केले आहे. यात अपंगत्वाचे प्रमाण व त्याच्या कारणाबाबत शासकीय रूग्णालयातील प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक राहील. अपंगत्व हे त्याच घटनेमुळे निर्माण झाले, हे सिद्ध असले पाहीजे. रूग्णालयात दाखल केलेल्याप्रकरणी संबंधित रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मदत वाटप करण्यात येईल. आपादग्रस्त व्यक्तींवर गुन्हे दाखल नसावे. पोलिसांकडून तशी खातरजमा करून घ्यावी लागेल.
अशी मिळेल मदतीची रक्कम
दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी अशा चारही प्रकारांतील कारवायांमध्ये जखमींना मदतीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यात हात, पाय, डोळे अथवा शरीरातील कोणताही अवयव निकामी झाल्यास आलेले अपंगत्व गृहीत धरण्यात येणार आहे. २५ ते ३९ टक्के अंपगत्व ५० हजार रूपये, ४० ते ६० टक्के अंपगत्व असल्यास एक लाख रूपये आणि ६० टक्क्यांच्यावर अपंगत्व असल्यास दोन लाख रूपयांची मदत मिळणार आहे.