पथ्रोट : नजीकच्या वागडोह गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरऐवजी ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवकाची तक्रार केली.
शहानूर गटग्रामपंचायतीत येणाऱ्या जनुना व वागडोह येथे कोरोनाग्रस्त आढळून आल्याने सॅनिटायझरची फवारणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला. मात्र, फवारणी करण्यात आली त्यावेळी सर्वत्र ब्लिचिंग पावडरचा गंध होता. गतवर्षीदेखील गावात दोनदा फवारणी करण्यात आली. त्यावेळीदेखील ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात आल्याचे व बिल सॅनिटायझरचे काढल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांना व्हॉट्सॲपवर दिलेल्या तक्रारीत ग्रामसेवकावर कारवाईची मागणी केली आहे. सदर ग्रामसेवकाची शहापूर ग्रामपंचायतीकरिता कायमस्वरूपी नियुक्ती नाही. त्याशिवाय आणखी दोन गावांचा कारभार असल्याने पंधरवड्यात एकदा गावाला ते भेट देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार चपराशाच्या भरवशावर आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वागडोह येथील रूपराव वरघट, राजेंद्र शिराळकर, अंकुश पात्रे, राजू पवार, मनोज जाधव, तरुण जाधव, किशोर कोसरे, अर्जुन राजने, गजानन खड्डे, श्यामलाल मोहिते, अक्षय वरघट, तेजस सोनोने, राऊत यांनी तक्रार दिली. आता ग्रामस्थांना कारवाईची प्रतीक्षा आहे.