दुर्लक्ष : तक्रार करायची कुणाकडे?
मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी : शहरातून गेलेल्या बैतूल ते सातारा या काँक्रीटीकरणाच्या राष्ट्रीय महामार्गाला अल्पावधीत तडे गेले आहेत. मात्र, त्याबाबत तक्रार करायची तरी कुठे, असा प्रश्न अंजनगावकरांना पडला आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांना त्या भेगा दिसतील का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. त्यात महाराष्ट्रातही अनेक महामार्गांचे काँक्रीटीकरण व चौपदरीकरण करण्यात आले. वर्षभरापूर्वी बैतूल ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणास सुरुवात झाली. मात्र, परतवाडा-अंजनगाव सुर्जी मार्गे अकोटकडे गेलेल्या या काँक्रिट रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून एक वर्षातच सिमेंट रोडला तडे जात असल्यास या रस्त्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. अशा गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. खुराणा नामक कंत्राटदार कंपनीकडे राष्ट्रीय महामार्गाच्या परतवाडा ते अकोट या भागाचे काम आहे. मोठा चौपदरी रस्ता होत असल्याने अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव व अकोट तालुक्यातील नागरिक खूश होते. मात्र, काही महिन्यांतच रस्त्याला तडे जात असून, रस्ता फुटण्याची शक्यता असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
विठ्ठल मंदिरासमोरील कामाची संथगती
अंजनगाव सुर्जी शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठल मंदिरासमोर पुलासाठी खोदकाम करण्यात आले. आता कुठे पुलाचे बांधकाम सुरू झाले. या बांधकामामुळे वाहतूककोंडी होऊन वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामानंतर काम बंद पडलेल्या पुलाच्या खड्ड्यात अनेक वाहने कोसळून अपघात झाले आहेत.
---------