लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्तदान म्हणजे जीवनदान, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले आहेत. पर्यायाने शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने 'लोकमत'च्यावतीने जिल्ह्यात २ ते ११ जुलै या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे.कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात आपला सक्रीय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९२७०१३१५८०
यांनी करावे रक्तदान - १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती.- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते.