४१ दात्यांचे रक्तदान : वाडेगावच्या लायदे कुटुंबाचा आदर्श वरूड : तालुक्यातील वाडेगाव येथील लायदे कुटुंबाने घरातील वयोवृद्ध सदस्याच्या मृत्यूनंतर तेरवीचा कार्यक्रम न करता त्याऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात ४१ जणांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला. वाडेगाव येथील श्रीराम लायदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाचही मुलांनी त्यांच्या या अंगभूत गुणाला जपून लायदे परिवार आणि रक्तदाता संघाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करून ४१ रक्तदात्यांनी श्रद्धांजली वाहिली. हा अभिनव उपक्रम छोट्याशा वाडेगावात राबविण्यात येऊन रक्तदानाबबात जनजागृती करण्यात आली. श्रीराम लायदे यांची मुले नामदेव, महादेव, प्रभाकर, किसना, लक्ष्मण आणि संजय यांनी पुढाकार घेऊन तेरवी आणि पिंडदान करण्याची जुनी परंपरा मोडीत काढत माणुसकीचे आणि समाजहिताचे दर्शन घडविले. वडिलांच्या तेरावीच्या कार्यक्रमात लायदे परिवार आणि ग्रामीण रूग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाचेवतीने रक्तदान शिबिर घेतले. तेरावीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या नातेवाईक, ४१ दात्यांनी रक्तदान करुन खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. लायदे कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तेरवीऐवजी रक्तदान शिबिराचा उपक्रम
By admin | Published: February 11, 2017 12:10 AM