मोर्शी : तालुका माहेश्वरी संघटना व महिला माहेश्वरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महेश नवमीचे औचित्य साधून स्थानिक अंगणानी मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर १८ जून रोजी घेण्यात आले. या शिबिरात २४ दात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन माहेश्वरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यप्रकाश मालानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, माहेश्वरी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. श्याम राठी, मोहन चांडक, डॉ. निकिता तारे, डॉ. प्राजक्ता गुल्हाने, माहेश्वरी संघटनेच्या महिला अध्यक्ष सावित्रीबाई राठी, विनोद ढवळे, विजय तापडिया उपस्थित होते.
सर्वप्रथम भाविकांचे श्रद्धास्थान महेश व स्वर्गीय अंकुश मंत्री यांच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्वतच रक्त संकलनासाठी पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अमरावती येथून आलेल्या डॉ. निकिता तारे, डॉ. प्राजक्ता गुल्हाने यांचे जिल्हा माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश मालानी, डॉ.श्याम राठी यांनी स्वागत केले. रक्तदान संकलनासाठी अमरावती येथील पीडीएमसीची चमू उपस्थित होती. कार्यक्रमासाठी माहेश्वरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला पदाधिकारी, सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून महेश उत्सव साजरा केला जात आहे.