अमरावती : हल्ली देशात मंदिर, मशीद, दर्गा, काही धार्मिक स्थळांवरून दोन समाजात तेढ, वादाची ठिणगी पडण्याचे चिन्हे दिसून येत आहे. मात्र, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमरावतीच्या साबणपुरा स्थित जामा मशिदीत मुस्लीम बांधवांनी सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. हा अनोखा उपक्रम सामाजिक समरसतेचे ‘शिव‘सूत्र बांधणारा ठरला. मुस्लीम समाजाने जातीय सलोख्याचा अनोखा परिचय देत मशिदीत पहिल्यांदाच रक्तदान झाल्याची नोंद करण्यात आली.
६ जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याला ३४८ वर्षे झाली आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण, समाजकारण केले जाते. मात्र, ३४८ वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या दलात मावळे जसे हिंदू, तसे मुस्लीमही होते. याच इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोमवारी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रफुल्ल कडू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, माजी महापौर विलास इंगोले, विदर्भ केसरी संजय तिरथकर, शेतकरी नेते विजय विल्हेकर, हाजी निसार अंसारी, हाफीज नाजीम, मुख्तार खान, शिरीन खान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठाेसरे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शेख सुल्तान आदी उपस्थित होते. यावेळी ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यापैकी ३० मुस्लीम महिला, पुरुषांचा सहभाग होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य हे देशाची एकात्मता, अखंडता जोपासणारे आहे. ३४८ वर्षांपूर्वी हिंदू-मुस्लीम हे दोघेही शिवराज्याभिषेक सोहळ्यात सामील होते. तोच प्रसंग शिवराज्याभिषेक दिनी सोमवारी जामा मशिदीत रक्तदान शिबिराच्या आयोजनाने आठवण जागी झाली, असे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जाणीव प्रतिष्ठानचे नितीन चौधरी, प्रदीप पाटील, मुकेश टारपे, आशिष कडू, डॉ. पराग सावरकर, अमोल शेंडे, पीयूष मोरे, आकाश देशमुख आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमात गुलशन स्पोर्टिंग क्लब, जाणीव प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, महात्मा फुले सेवा संघ, राष्ट्रसेवा दल व दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेड सहभागी झाले होते.