अमरावती : कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्तदान करता येईल की नाही, हा नागरिकांमध्ये संभ्रम असेल. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली, हिमोग्लोबीन चांगले असतील त्या व्यक्तीला लसीकरणानंतर १४ दिवसांतच रक्तदान करता येते. त्यामुळे २८ दिवसांची वाट न पाहता आयोजित शिबिरांमध्ये इच्छुकांनी मनात भीती न बाळगता बिनधास्त रक्तदान करण्याचे आवाहन जिल्ह्या शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी लोकमतद्वारा घेण्यात आलेल्या मुलाखतीत केले.
कोरोना काळात कॉलेजेस, सामाजिक उपक्रम, एनजीओंची कार्य थांबविण्यात आल्यामुळे जिल्ह्यात रक्तदान शिबिरे फार कमी प्रमाणात झालीत. मात्र, अमरावती जिल्ह्याला खऱ्या अर्थाने रक्ताची देण लाभलेली असल्याने येथे उपचारार्थ येणाऱ्या विविध भागातील गरजू रुग्णांना वेळेवर हवे त्या गटाचे रक्त उपलब्ध झाले. एका हाकेवर अमरावतीकरांनी ब्लड डोनेटसाठी हजर झालेत. त्यामुळे कुठेच रक्ताची कमतरता भासली नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी मुलाखतीत सांगितले.अमरावती जिल्ह्यात ड्लड बँकेची सुरुवात सन १९८० मध्ये झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ ठिकाणी शासकीय रक्तपेढी आहेत. यामध्ये वरूड, मोर्शी, अचलपूर, धारणी, चिखलदरा, चुरणी, दर्यापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय व डफरीनचा समावेश आहे. लोकमतद्वारा नियोजित रक्तदान शिबिराला जिल्हा आरोग्य प्रशासनाचे सहकार्य राहील. या अभियानाच्या माध्यमातून रुग्ण सेवेत भरीव मदत होणार आहे. श्रद्धेय बाबूजी ऊर्फ जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीप्रीत्यर्थ राबवित असलेल्या या उपक्रमाचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून स्वागत आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम म्हणाले. लोकमतने आमंत्रित करून माझे मार्गदर्शन घेतल्याचे समाधान त्यांनी संस्कृत कवितेतून केले.
बॉक्स
यांना भासते रक्ताची गरज
हिमोफिलिया, सिकलसेल, थॅलेसिमियाग्रस्तांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यानंतर आपघातग्रस्त, सिझेरियन दरम्यान महिलांना अतिरक्तस्त्राव झाल्याने, अनिमियाग्रस्तांना रक्ताची आवश्यकता भासते. अशांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिरे घेणे गरजेचे आहे. शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. निकम यांनी यावेळी केले.