फोटो पी ०१ धामणगाव
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : कुणाला दुर्धर आजार असो अथवा सिकलसेल, सकाळी, रात्री कुणी फोन केला किंवा साधा मॅसेज आला तरी गरजू रुग्णापर्यंत पोहोचून अनोळखी व्यक्तींनाही रक्तदान करण्याची चळवळ शहरात शिवराज गणेश मंडळाकडून अविरत सुरू आहे.
धामणगाव शहरातील शुभम अशोक बिडकर या ध्येयवेड्या युवकाने आठ वर्षांपूर्वी शहरात शिवराज गणेश मंडळाची स्थापना केली. गणेश मंडळाने दहा दिवस वर्गणी जमा करणे व शेवटच्या दिवशी जल्लोष करून गणेशाचे विसर्जन करणे हा मर्यादित उद्देश न ठेवता वर्षभर गरजू, निराधार. दिव्यांग व्यक्तींना आधार देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
चोविसाव्या वर्षांत दहा वेळा रक्तदान
शिवराज गणेश मंडळाच्यावतीने शहरात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन वर्षातून तीन वेळा करण्यात येते. मंडळाचा अध्यक्ष शुभम बिडकर याने वयाच्या पंधराव्या वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला. अण्णाभाऊ साठे जयंती असो वा स्वतःचा वाढदिवस, रक्तदान शिबिरात शुभम प्रथम रक्तदान करतो आणि त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक जबाबदारी ओळखत रक्तदान करतात. वयाच्या चोवीसाव्या वर्षी दहा वेळा रक्तदान करून शुभम बिडकर यांनी अनेकांचे प्राण वाचविले.
कोरोनाकाळात दिला निराश्रितांना आधार
कोरोणाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला लॉकडाऊन लागल्याने अनेकांनी शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत प्रवास करावा लागला होता. यावेळी शिवराज गणेश मंडळाचे कार्यकर्ते निराश्रितांसाठी देवदूत ठरले होते. पायी येणाऱ्यांना चहा, पाणी, नाष्टा, जेवणाची अविरत सेवा शुभम बिडकर यांच्या पुढाकाराने देण्यात आली होती.