अमरावती :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या जनआंदोलनाला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा देत, १ नोव्हेंबरला सिंदखेडराजा येथे कार्यकर्त्यांस रक्तदान करण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रक्तदान करून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.
राज्यभरात सध्या सर्वत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. सरकारला दिलेल्या ४० दिवसांनंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्याने मनोज जरांगे-पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आपल्या गावामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये मराठा समाजबांधवांतर्फे हिंसक आंदोलनही होत आहेत. अशातच आता आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटीलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सिंदखेडराजा येथे रक्तदान करीत आहे. त्याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्ष महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती मधील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करुन पाठिंबा दिला आहे.
यावेळी २० प्रहार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या रक्तदानामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा अध्यक्ष छोटू वसू महाराज, महानगरप्रमुख बंटी रामटेके, संपर्कप्रमुख गोलू पाटील, नितीन शिरभाते, प्रशांत शिरभाते यांच्यासह श्याम इंगळे, सुधीर मानके, ऋषभ मोहोड, मनीष पवार, तन्मय पाचघरे, विक्रम जाधव, मनीष देशमुख, शेषराव धुळे, कुणाल खंडारे, दिनेश बसटे, रोहित खंडागळे, पंकज सुरळकर, प्रशिक इंगोले आदींनी रक्तदान केले.