अमरावती : कोरोना या राष्ट्रीय आपत्तीत सामाजिक दायित्व म्हणून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’अमरावतीच्यावतीने अभियंता भवनात रविवारी दुपारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. लॉकडाऊन असतानाही ६० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, श्यामसुंदर निकम यांनी रक्ताचा तुटवडा दूर करण्याकरिता केलेल्या आवाहनानुसार सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात सोशल डिस्टंसिंग, मास्क सॅनिटायझर या सर्व बाबींचे तंतोतंत पालन करण्यात आले. विशेषत: शिबिरात संघटनेच्यावतीने महिला डोनरचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा रक्त संकलन अधिकारी अमित क्षार यांनी रक्ताची गरज, त्याचे महत्त्व सांगून रक्ताला दुसरा पर्याय नसल्याने प्रत्येक नागरिकाने रक्तदान हेच सामाजिक कर्तव्य समजून नियमित रक्तदान करावे, याविषयी मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून कोरोनातून बरे झालेल्या बांधवांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. यावेळी पंकज उभाड, कुलदीप उभाड, विक्रांत देशमुख, गौरव राऊत, प्रीती विधाते, नीलेश बहिरे, कुलदीप काळमेघ, शरमेश धरमकर तसेच सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीच्यावतीने डॉ. अमित क्षार, उमेश आगरकर, मनोज पाटील, संगीता गायधने, पूजा हजारे, नितीन बोरकर, ठाकरे आदींचे सहकार्य लाभले.