लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस खात्यात असताना माणसांचे जीव वाचविण्यासाठी आम्ही धावपळ करतो. रक्ताची तजवीज करतो. तेव्हा प्राण वाचविणारे ते रक्त कुणाचे, हे माहीत नसते. रक्तदाताही माहीत नसतो. सबब, रक्तदान हे परमदान तथा रक्तदाता हा समाजाचा खरा हिरो असल्याचे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी येथे केले. त्यांनी ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती. ते औचित्य साधून ‘लोकमत’च्या अमरावती कार्यालयात शुक्रवारी ‘लोकमत रक्ताचं, नातं’ या रक्तदान शिबिराचा आगाज करण्यात आला. त्याप्रसंगी मीना बोलत होते. यावेळी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सीएस डॉ. श्यामसुंदर निकम, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, विक्रम टी प्रोसेसरचे जिल्हा व्यवस्थापक प्रसाद पांढरीकर, ‘लोकमत’च्या अमरावती युनिटचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गजानन चोपडे, हॅलो हेड गणेश वासनिक, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनील चौरसिया उपस्थित होते. श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहून रक्तदान कार्यक्रमाचा मान्यवरांनी आगाज केला. रक्तदान करणे हे पोलिसांचे कल्चरच. ती संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी पोलीस यंत्रणा ‘लोकमत’ सोबत असल्याचे आयजी मीना म्हणाले. रक्तदानासाठी लोक समोर आल्यास रक्ताच्या काळाबाजाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे यांनी केले.
महावितरणचे सहकार्यकोरोनात महावितरणने ६ हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले. हिच सामाजिक बांधीलकी जोपासत ‘लोकमत’ परिवाराकडून सुरू करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी शुभेच्छा दिल्या.
कोरोनाकाळात अधिक गरज : राज्य कोरोना संक्रमणातून हळूहळू बाहेर येत आहे. मात्र, दीड वर्षात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे कोविड काळात रक्तसंकलन अगत्याची बाब आहे. ‘लोकमत’ने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे मत अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केले. हा महायज्ञ यशस्वी होईलच, तथापि, लोकमतने भविष्यातदेखील रक्तदान चळवळ राबवावी, असे सीईओ अविश्यांत पंडा म्हणाले.