अमरावती : शेगाव नाका येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत लागलेला एसीचा ब्लोअर व्हीनस प्लाझा येथील घरापुढे लागला आहे. त्याच्यातून निघणाऱ्या उष्ण हवेच्या झोताने वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे गाऱ्हाणे व्हीनस प्लाझा येथील नागरिकाने महापालिका आयुक्तांकडे मांडले आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीनुसार, अमितकुमार सावलानी यांच्या घरापुढे लावलेल्या एसीच्या ब्लोअरच्या मोठ्या पात्यांची घरघर त्रस्त करीत आहे. त्यामधून निघणारा उष्ण हवेचा झोत थेट घरात येत असल्याने अमितकुमार यांचे वडील मनोहरलाल सावलानी (८२) यांची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी त्यांना डॉ. ककरानिया यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे.
व्हीनस प्लाझा येथे १० ड्युप्लेक्स व ७५ प्लॉटधारक वास्तव्यास आहे. एसीचा ब्लोअर सोसायटीच्या आत लागला असून, त्यामधून पाणी गळत असल्याने त्याखाली मधमाशांचे पोळे तयार झाले आहे. त्याचाही येथील रहिवाशांना त्रास होत असून, याबाबत १० नोव्हेंबरपासून बँकेकडे ई-मेलने संपर्क साधण्यात आला तसेच व्यवस्थापकाचीही प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. मात्र, काहीही परिणाम झाला नाही. या विषयात तातडीने कार्यवाहीचे आदेश द्यावे, अशी मागणी अमितकुमार सावलानी यांनी केले आहे.