फोटो पी १९ खारतळेगाव
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील पुरात रविवारी वाहून गेलेल्या दोन युवकांचे मृतदेह सोमवारी आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधून काढले. निरंजन गुडधे (२६) व प्रवीण गुडधे (३४) अशी मृतांची नावे आहेत.
खारतळेगाव येथे वाहणाऱ्या पेढी नदीमध्ये १८ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास दोन इसम बुडाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. जिल्हाधिकारी पवनीत कौर व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ चे समादेशक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर व पोलीस निरीक्षक मारुती नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ वाजता चमू घटनास्थळी दाखल झाली.
सर्वप्रथम रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. खारतळेगाव व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे पेढी नदीला फार मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. रेस्क्यू टीमने लिटबॉय रिंगच्या साहाय्याने पाण्यात उतरून शोधकार्य राबवले. अंधार पडल्यामुळे सायंकाळी ७ वाजता शोधकार्य थांबवण्यात आले. नदीचा प्रवाह वेगवान असल्यानेही शोधकार्यात अडचणी येत होत्या.
शोधकार्याला १९ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता परत सुरुवात करण्यात आली. आदल्या दिवशी ज्या ठिकाणी शोधकार्य थांबविण्यात आले होते, त्या ठिकाणापासून बोटीच्या साहाय्याने परत शोधकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळावरून अंदाजे तीन किलोमीटरच्या अंतरावर प्रवीणचा मृतदेह हाती लागला. तो मृतदेह काढून रेस्क्यू टीमने पोलिसांच्या हवाली केला. रेस्क्यू टीम परत निरंजन यांचा मृतदेह शोधण्याच्या कामी लागले. प्रवीणच्या मृतदेहापासून शंभर मीटरच्या अंतरावर निरंजनचा मृतदेह गाळात फसला असल्याचे आढळले. तो मृतदेह काढून रेस्क्यू टीमने पोलिसांच्या हवाली केला.
रेस्क्यू टीममध्ये हेमंत सरकटे, कौस्तुभ वैद्य, दीपक पाल, हिरा पवार, अर्जुन सुंदरडे, उदय मोरे, पंकज येवले, गजानन वाडेकर, अजय आसोले, आकाश निमकर, महेश मांदाळे, गजानन मुंडे (चालक), शंकर मुधोळकर (चालक) यांचा समावेश आहे.
190721\img-20210719-wa0080.jpg
खारतळेगाव पुरात वाहून गेलेल्या दोन इसमांची मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळले