फोटो पी २४ नांदगाव पेठ
अमरावती : लगतच्या नांदगाव पेठ शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख राकेश रामदेव पासवान (६१, रा. लालगंज, बिहार) अशी पटविण्यात आली आहे. डोके ठेचलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी गणेश साखरवाडे यांच्या नांदगाव पेठ स्थित शिवारात अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. दोन दिवसांपूर्वी त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक कयास व्यक्त होत आहे.
नांदगाव पेठ पोलिसांना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की, एक बेवारस कार दोन दिवसांपासून चिखलात फसलेली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळ गाठून बेवारस वाहनाची पाहणी केली. तेथून हाकेच्या अंतरावर साखरवाडे यांच्या विहिरीच्या पायथ्याशी राकेशकुमार यांचा कुजलेला मृतदेहदेखील आढळून आला. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान जी.जे. ०१, आर.वाय. ९३५८ क्रमांकाचे चारचाकी वाहन चिखलात फसले होते. मृत व्यक्ती स्टेअरिंगवर बसला होता. एक जण कारला धक्का मारत होता, अशी माहिती पोलिसांना हाती लागली.
पोलिसांनी वर्तविली घातपाताची शक्यता
साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीजवळ राकेशकुमार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली व हत्येनंतर मृतदेह विहिरीत ढकलण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला होता. परंतु, वजन जास्त असल्याने मृतदेह विहिरीवरच सोडून आरोपी तेथून पसार झाला. मृत व्यक्ती गुजरात येथे वास्तव्यास असून दर दोन महिन्यांनी ती लालगंज येथील आपला परिवार व शेती बघण्याकरिता वाहनाने जायचे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
गुंता सोडविण्याचा प्रयत्न
वाहनातून किती जण प्रवास करीत होते, महामार्ग सोडून ते वाहन अडगळीच्या मार्गाने कुठे निघाले होते, हत्येचे नेमके कारण काय, असे अनेक प्रश्न तूर्तास अनुत्तरीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी, एसीपी डुंबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठोसरे, नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती.