अमरावती : कोरोनावरील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल ७२ वर्षीय इसमाचा शहरातील गाडगेनगर हद्दीतील भीमनगरात मृतदेह आढळून आला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रुग्णालयाबाहेर पडू शकलेल्या या रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. वृत्त लिहिस्तोवर नातेवाईक गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी
बसले होते. किसन श्रावण झुरे (रा. आजणगाव, ता. धामणगाव रेल्वे) असे मृताचे नाव आहे. २२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने त्यांना त्याच दिवशी सुपर स्पेशालिटीत दाखल करण्यात आले. २३ एप्रिल रोजी त्यांना प्राणवायू लावण्यात आला असून, ते ठिक आहेत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. २४ एप्रिल रोजी नातेवाइकांनी जेवणाचा डबा पोहचविला. मात्र, त्याच दिवशी भीमनगरात किसन झुरे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तो अनोळखी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात दाखल केला. विशेष म्हणजे, २५ एप्रिल रोजीदेखील रुग्ण ठीक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याचे मुलगा मारुती झुरे यांनी माहिती दिली.
दरम्यान, मृताच्या जावयाला सासरे शहरातील एका मार्गावर दगावल्याची माहिती मोबाईलवरून मिळाली. त्यानंतर नातेवाइकांनी सुपर स्पेशालिटीत धाव घेत, रुग्णाला भेटू देण्याची विनवणी केली. मात्र, कोविड कक्षात जाता येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. याच सुमारास नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृताची ओळख पटविली. नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी उशिरा सायंकाळपर्यंत पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.