आठवडाभरापासून बेपत्ता, आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील जावरा कामनापूर येथील बेपत्ता शेतकऱ्याचा वलगाव येथील पेढी नदीपात्रात बुधवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद वलगाव पोलिसांनी घेतली आहे.
नागोराव श्रीराम खैरकार (५०) असे मृताचे नाव आहे. ते हरविल्याची तक्रार मुलाने पोलिसांत दिली होती. त्यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगाना दिसताच घटनास्थळावर बघ्यांची गर्दी उसळली. वलगाव पोलिसांना मृताच्या खिशातून आधारकार्ड मिळाल्याने ओळख पटली. नागोराव खैरकार हे सहा ते सात दिवसांपासून घरी नसल्याने ते हरविल्याची तक्रार मुलगा मनीष खैरकार यांनी नोंदवली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. त्यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी घेतली.
नागोराव खैरकार यांच्या पश्चात ८० वर्षीय आई, पत्नी, अविवाहित मुलगा आहेत. त्यांच्याकडे पावणेतीन एकर शेती असल्याची माहिती कामनापूर येथील कोतवालाने दिली. ते कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा झडत आहे.