धारणी तालुक्यानजीक मध्यप्रदेशाची सीमा अवघ्या १८ किमी अंतरावर आहे. तेथील प्रेमीयुगल अरुण समाधान गंगतीरे (२५) व १७ वर्षीय अल्पवयीन करीना (दोघेही रा. सागमली, ता. खकणार, जिल्हा बऱ्हाणपूर) हे १९ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला.
दरम्यान, शनिवारी सागमली येथीलच काही युवकांना सुसर्दा वनपरिक्षेत्रालगत असलेल्या वनखंड क्र. १०७ मध्ये गुरे चारत असताना दोघांचे मृतदेह तेथे आढळून आले. विषाची बॉटलही होती. त्या युवकांनी गावात येऊन दोन्ही कुटुंबांना माहिती दिली सायंकाळी ७ वाजता घटनास्थळावर जाऊन त्यांनी पाहणी केली. राजपूर येथील पोलीस पाटलाने धारणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर व प्रशांत गीते, पोलीस कर्मचारी सुभाष सावलकर, बाबूलाल कासदेकर यांनी घटनास्थळी जाऊन रात्री १२ वाजता दोघांचेही मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदनाकरिता आणले. रविवारी शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. दोघांवरही सागमली गावात एकाच ठिकाणी अंत्यसंकार करण्यात आले.
--------------
औरंगाबादला पलायन, कपड्यांची खरेदी
आत्महत्या करण्याआधी प्रेमीयुगुलाने औरंगाबाद गाठल्याचे त्यांच्या खिशात सापडलेल्या बसच्या तिकिटावरून समजले. अकोट येथून त्यांनी कपडे खरेदी केल्याचे बिलही सापडले. पोलिसांना घटनास्थळी त्यांची कपड्याची बॅग, मोबाईल व विषारी औषधाची ताब्यात घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.