अमरावती : माहुली जहागीर येथील अनधिकृत गोदामात सापडलेल्या २.३९ कोटींच्या रासायनिक खत प्रकरणाचा गुंता वाढतच आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व तेलंगणा राज्याशी या प्रकरणाचे तार जुळलेले आहेत. स्वस्तातील या बोगस खतांचे आमिष देऊन कंपनीने शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा घाला घातला. त्यामुळे अनेकांचा खरीप हंगामच धोक्यात आला आहे.
दरम्यान अमरावतीनंतर जळगाव जिल्ह्यातही पोलिस पथकांद्वारा तेथील कृषी विभागाच्या सहकार्याने १२ लाखांचे अनधिकृत खत पकडण्यात आले आहे. त्यानंतर मध्ये प्रदेशातही नवभारत फर्टिलायझर ही कंपनी सील करण्यात येऊन येथील कृषी विभागाने पोलिसात तक्रार नोंद केलेली आहे. याशिवाय येथील एक पथक आरोपीच्या शोधार्थ व खत उत्पादनाची चौकशी करण्यासाठी हैद्राबाद येथे रवाना झाले असल्याने या प्रकरणाचे तार तेलंगणा राज्याशीही जुळले असल्याचे तपास अधिकारी तथा एसडीपीओ सुर्यकांत जगदळे यांनी सांगितले.