चांदूर बाजार : स्थानिक नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानाचा निधी नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा फज्जा उडाल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला. मात्र, सदर हे आरोप बिनबुडाचे असल्याची माहिती नगराध्यक्ष नितीन कोरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चांदूर बाजार नगर परिषदेला पहिला १६७ लाभार्थ्यांचा प्रस्ताव मंजूर असून त्यापैकी प्रथम अनुदानापोटी ६६ लक्ष ८० हजार तसेच दुसरा टप्पा म्हणून १ कोटी २० हजार नगर परिषदेला प्राप्त झाल्यानुसार अनुदानाचे वितरण लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे. मात्र तिसऱ्या टप्प्याचे अनुदानाकरिता पालिकेला निर्देशित करण्याची मागणी गोपाल तिरमारे यांनी केली. एकूण ६०८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट मंजूर असताना उर्वरित लाभार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे गरजेचे असतानासुद्धा नगरपालिकेने प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला नाही, असा आरोप गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. असे न झाल्यास सोमवारपासून नगरपालिकेसमोर अन्नत्याग आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
याबाबत नगराध्यक्ष नितीन कोरडे यांनी पत्रकार परिषद घेतली. १६७ लाभार्थ्याचे तिसऱ्या टप्प्याचे अनुदान हे केंद्र शासनाकडे थकीत आहे. याकरिता पालिकेने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. घरकुलांकरिता अर्ज करणाऱ्या ७० पात्र लाभार्थ्यांचे अतिक्रमणसुद्धा नियमाकुल केले आहे. उर्वरित अतिक्रमणसुद्धा लवकरच नियमाकुल करणे सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष कोरडे यांनी दिली. यासोबतच दुसरा डीपीआरकरिता उर्वरित ४४० लाभार्थी असतानाही पालिकेने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ लाभार्थ्यांना व्हावा, याकरिता ४५६ ऑनलाईन व २७० ऑफलाईन अर्जाचा प्रस्ताव ५ मार्च २०२१ रोजी शासनाकडे पाठविला आहे. पहिला डीपीआर हा २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर झाला होता. मात्र, तत्कालीन सत्तारुढ गटाच्या दिरंगाईमुळे अडीच वर्षांपासून रखडलेला आहे. ३ महिन्यापासून पालिकेवर प्रहारची सत्ता स्थापन झाली असून, आपण तात्काळ तो प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामुळे नगरसेवक तिरमारे हे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप करीत असल्याचे नितीन कोरडे यांनी पालिका सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नगरसेवक सचिन खुळे, शिषिर माकोडे, अभियंता भूषण देशमुख उपस्थित होते.