कावली वसाड : गतवर्षी अतिवृष्टीने गारद झालेल्या सोयाबीनचा नाद न धरता कावली परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड वाढविली. मात्र, आता पावसाने ठिय्या दिल्याने बोंडे लाल झाली आहेत. अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन सडण्याच्या मार्गावर आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. गतवर्षी दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनला शेंगाच न आल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पीक जनावरांना चारा म्हणून खाऊ घातले. यावर्षी कपाशीची पेरणी अधिक प्रमाणात झाली. सुरुवातीच्या काळात मजुरांची कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील निंदण, खुरपण घरीच केले. काही शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केला. पीक आता हातातोंडाशी आले. परंतु पाऊस काही जाण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांनी देवाला साकडे घातले आहे.
एकीकडे लवकर येणारे वाण शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरले. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीला किमान ३० ते ४० बोंडे तयार झाले. यावर्षी उत्पन्नात वाढ होईल, ही अपेक्षा पावसामुळे फोल ठरली आहे. ही बोंडे लाल पडली आहेत. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतात वेचणीला आलेला कापूस भिजला आहे. झाडावरील पाने संपूर्ण गळून पडली आहे. आता केवळ बोंडे तेवढे शिल्लक उरली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कापूस वेचणीला सुरुवात केली, तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला सुरुवात केली. कापूस भिजला असल्याने घरोघरी तो वेचून सुकविला जात आहे. ज्यांना शक्य आहे, ते ओले सोयाबीन हार्वेस्टरने काढून तेही घरी सुकविण्याची कसरत करीत आहेत. दरदिवशी कमी होत असलेल्या सोयाबीनच्या दरानेही शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
260921\img_20210926_114216.jpg
फोटो