राज्य शासनाने १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींकरिता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू केला. दररोज सकाळी ७ वाजता लिंकद्वारे नावाची नोंद केली जाते. विशेष म्हणजे, कोरोना लसीकरणासाठी कोविन संकेत स्थळावरील अपॉईंटमेंट बूकिंग रेल्वेच्या तात्काळ तिकिटापेक्षाही लवकर संपत आहे. दररोज फक्त एकच दिवसाची बूकिंग उपलब्ध करण्यात येत असल्यामुळे आणि ते लगेच संपत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. अमरावती शहरातील नागरिक चांदूर रेल्वे, धामणगाव व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन बूकिंग करून लस घ्यायला येत आहेत आणि स्थानिक नागरिक वंचित राहत आहे.
धामणगाव रेल्वे. चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचे लक्षांक वाढवून देणे गरजेचे आहे तसेच प्रशासनाने एक दिवसाऐवजी संपूर्ण आठवड्याचे तथा स्टॉकनिहाय बूकिंग घेतल्यास नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव परीक्षित जगताप यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.