दोन विद्यार्थी जखमी, आमदारांना निवेदन
बडनेरा : पाच बंगला मार्गे बोरगावकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला आहे. एका महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी दुचाकीवरून पडल्याने जखमी झाले. यामुळे तत्काळ रस्ता बनवा, असे निवेदन विद्यार्थ्यांनी खासदार व आमदारांना भेटून दिले. या मार्गाने भाविक तसेच शेतकरी मोठ्या संख्येत जात असतात. वॅगन कारखान्यावर जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे हा रस्ता यापूर्वीच खराब झाल्याचे म्हटले आहे.
पाच बंगला परिसरातून बोरगावकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले, तर पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे. याच मार्गावरील एस.एल. महाविद्यालयात शिकणारे हेमराज घास, चारुदत्त शिखरे हे दोन विद्यार्थी खड्ड्यामुळे दुचाकीवरून खाली पडले. त्यांना गंभीर इजा झाली. यापूर्वीदेखील अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. याच मार्गावरून पांढरीच्या मारुतीला अनेक भाविक जात असतात. बडनेऱ्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा हाच मार्ग आहे. किती दिवस या खडतर रस्त्यावरून जायचे, असा त्यांचा संतप्त सवाल आहे. विद्यार्थ्यांनी नुकतेच खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांना भेटून या रस्त्याची दयनीय अवस्था निवेदनातून मांडली. लवकरात लवकर हा रस्ता नव्याने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.