आठवडाभरात चौघे दगावले, रुग्णसंख्या कमालीची वाढली
तिवसा : तालुक्यात डेंग्यूचे थैमान सुरूच असून बालकांना मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा विळखा घट्ट केला आहे. गुरुवारी सकाळी नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला.
कृष्णा सचिन गौरखेडे (१३, रा. तिवसा) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याचा अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. त्यापूर्वी मंगळवारी पहाटे अजय विजय रेवतकर या आठ वर्षीय चिमुकल्याचा नागपूर येथे डेंग्यूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी ताप आल्याने त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, ताप कमी न झाल्याने जिल्हा रुग्णालयात हलविले. प्रकृती खालावल्याने नागपूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते.
तिवसा शहरातील आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून आतापर्यंत दोन आठवड्यात चार जणांचा डेंगू या आजारामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरासह तालुक्यात विविध आजाराची लागण होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अस्वच्छता, नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव व वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्याने तिवसा शहरात मृत्युदर वाढत असल्याची चर्चा शहरात दिसून येत आहे. शहरातील आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.