चिखलदरा (अमरावती) : सातपुडा जंगलातील खटकालीनजीक पठार नदीच्या डोहात दोन मुले बुडाली. ही घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. अ. नफीज अ. हमीद, शे. सुफीयान शे. अमीन अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. दोघेही अकोटमधील रहिवासी आहेत.
अकोट-धारणी मार्गावर पठार नदीत वाहते. या नदीतील डोहात ही मुले आंघोळीसाठी उतरली होती. डोहातील खोल पाण्याचा अंदाज चुकल्याने ती बुडाली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटननास्थळावर प्रशासनासह अनेक जण दाखल झाले. पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने डोहातील पाण्यात शोध घेत मृतदेह बाहेर काढले. यामध्ये १६ वर्षाचा अब्दुल नफीज अब्दुल हमीद हा अकबरी प्लाॅट, तर १९ वर्षाचा शेख सुफियान शेख अमीन हा इफ्तेखार प्लाॅट येथील रहिवासी असल्याची माहिती अकोटचे तहसीलदार नीलेश मडके यांनी दिली. मुलांचे मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा नातेवाइकांसह नागरिकांनी गर्दी केली.
चिखलदराचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी घटनेला दुजोरा दिला. मुले बुडाली ते घटनास्थळ चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांना घटनेची माहिती कळविण्यात आली. सध्या सातपुड्यात अतिवृष्टी असल्याने नदी-नाल्यात, डोहात पाण्याची पातळी वाढली आहे. पोपटखेड धरणसुद्धा तुडुंब भरले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी, विशेषत: पोहण्याची आवड असणाऱ्या मुलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.