अमरावती : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना दिल्लीहून अटक करण्यात आली. ही कारवाई ग्रामीण सायबर सेलच्या तपास अधिका-यांनी मंगळवारी केली. रमेश मिश्रा (२३) व रामप्रकाश सोनी (३३) अशी आरोपींची नावे आहेत.परतवाडा येथील पवन राजेंद्र गुप्ता यांना नॅशनलाइज्ड बँक एचडीएफसीमध्ये नोकरीवर लावून देण्यासंदर्भात कॉल आला. क्विकर डॉट कॉमच्या माध्यमातून आरोपींनी गुप्ता यांचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यासाठी बँक खात्यामध्ये रजिस्ट्रेशन फीसह एकूण २१ हजार जमा करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे गुप्ता यांनी पैसे जमा केले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवन गुप्ता यांनी अमरावती ग्रामीण सायबर सेलकडे २४ जानेवारी रोजी तक्रार दिली. सायबर सेलच्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी एक महिन्यात आरोपी रमेश मिश्रा (रा. रिवा, मध्यप्रदेश), राम प्रकाश सोनी (रा. गोसाईगंज, जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश) यांना दिल्लीतील अशोकनगर येथून अटक केली. दोघेही उच्चशिक्षित तरुण आहेत. दोघांना बुधवारी अचलपूर सत्र न्यायालयात हजर केले असता, ६ मार्चपर्यंत पीसीआर मिळाला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद राऊत, वीरेंद्र चौबे, पोलीस कर्मचारी वसंत कुरई, सागर भटकर, विलास अंजीकर यांनी केली. अमरावती येथे काही महिन्यांपूर्वीच सायबर सेल हा विभाग सुरू झाला असून, हा पहिलाच आॅनलाईन गुन्हा उघडकीस आला आहे.>ंचौकशीदरम्यान इतरही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात. त्या दिशेने आरोपींचा कोठडीत तपास सुरू आहे.- अरविंद राऊत, तपास अधिकारी, ग्रामीण सायबर सेल.
नोकरीचा कॉल देऊन गंडविणा-या दोघांना दिल्लीहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 5:05 AM