लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सातबारा आणि ई -फेरफारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २०१२ पासून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर राबविला जात आहे. त्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गास शासनाकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पुरविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, अद्यापही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वरील साहित्याचा पुरवठाच केलेला नाही. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी सातबारा संगणकीकरण, ई-फेरफारच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी तिवसा व भातकुली यांना १ मार्च रोजी विदर्भ पटवारी संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. याचवेळी तलाठ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे डिजिटल सिग्नेचर सर्टीफिकेट (डीएससी) जमा करून आपली नाराजी व्यक्त केली.सात-बारा आणि ई-फेरफारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २०१२ पासून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या स्तरावर राबविला जात आहे. शासनाने यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंन्टर पुरविण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. मात्र, तीन वर्षांपासून याची प्रशासनाने दखल घेतली नाही. दरम्यान, विदर्भ पटवारी संघाने लॅपटाप व प्रिंटर पुरविण्याबाबत वारंवार निवेदने दिलीत. तद्नंतर २ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा पटवारी संघाचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर मागणीकडे लक्ष वेधले. प्रशासनाने सदर साहित्य खरेदीसाठी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्याचे कळविले तरी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे संघाने सर्व संगणकीय कामकाजावर तहसीलदार व एसडीओ यांच्याकडे डीएससी जमा करून बहिष्कार टाकला. पटवारी संघाचे अध्यक्ष एस.पी. इंगळे, व्ही.एम दुधे, एस.बी.धुर्वे, रेखा परिहार, वैभव बिहाडे व पदाधिकारी तसेच तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
संगणकीय कामकाजावर तलाठ्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 1:19 AM
राज्यात सातबारा आणि ई -फेरफारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २०१२ पासून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर राबविला जात आहे. त्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गास शासनाकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पुरविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
ठळक मुद्देविदर्भ पटवारी संघ : शासनाकडून लॅपटॉप, प्रिंटर उपलब्ध न केल्याने निर्णय