आदिवासी शेतकऱ्यांसाठी योजना : शासन निर्णयामुळे मिळणार दिलासाअमरावती : वीज पंप - तेलपंप पुरवठा योजनेचा लाभ अधिकाधिक आदिवासी शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी एचडीपीई पाईप पुरवठा योजनेतील दारिद्र्य रेषेची अट काढून टाकण्यात आली आहे. एचडीपीई पाईप पुरवठा योजनेचा सरसकट सर्व आदिवासींना लाभ देऊन त्यांची अधिकाधिक जमीन ओलिताखाली यऊन त्यांचा आर्थिक विकास साधण्यास हातभार लागत असल्याने दारिद्र्यरेषेची अट शिथिल करण्यात आली आहे. आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वीजपंप, तेलपंप मंजूर केले जातात. या योजनेशी संलग्न योजना म्हणून आदिवासी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप पुरवठा करणे, ही योजना आदिवासी विकास विभागाच्या सन २००४ पासून राबविण्यात येत होती. परंतु पीव्हीसी पाईपपेक्षा एचडीपीई पाईप वजनाला हलके, मजबूत व टिकाऊ असल्याने व त्यावर रासायनिक पदार्थाचा परिणाम होत नसल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या २४ डिसेंबर २००८ च्या शासन निर्णयान्वये दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप ऐवजी एचडीपीई पाईपचा पुरवठा ही योजना लागू केली. वीजपंप, तेलपंप पुरवठा योजनेंतर्गत निवड केलेले लाभार्थी हे किमान दीड एकर व कमाल १६ एकर क्षेत्र असलेले शेतकरी असल्याने त्यामध्ये अत्यल्प दारिद्र्य रेषेखाली शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे वीजपंप, तेलपंप मंजूर केलेल्या बहुतांश लाभार्थ्यांना एचडीपीई पाईप पुरवठा योजनेला लाभ मिळत नाही. एचडीपीई पाईप पुरवठा योजनेचा लाभ सरसकट सर्व आदिवासी शेतकऱ्यांना दिल्यास त्यांची अधिकाधिक जमीन सिंचनाखाली येऊन त्यांचा आर्थिक विकास साधण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे एचडीपीई पाईप पुरवठा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील अट शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (प्रतिनिधी)अशा आहेत अटी आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप, तेलपंप पुरविणे योजनेंतर्गत ज्या आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप, तेलपंप मंजूर करण्यात आले आहेत. त्या आदिवासी शेतकऱ्यांची निवड करण्यात यावी. वनहक्क कायदा, २००६ अंतर्गत ज्या आदिवासी लाभार्थ्यांना जमीन मिळालेली आहे व ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांची निवड करण्यात यावी. या योनजेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. ज्येष्ठतेनुसार लक्षांकाच्या प्रमाणात लाभ देण्यात यावा.असा आहे निर्णय आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप, तेलपंप पुरवठा योजनेचा लाभ दिला जातो. वीजपंप, तेलपंप पुरवठा योजनेशी संलग्न योजना म्हणून एचडीपीई पाईप पुरवठा योजना राबविण्यात येते. आदिवासी शेतकऱ्यांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तसेच योजना अंमलबजावणीच्या दृष्टीने दारिद्र्यरेषेची अट शिथिल करून एचडीपीई पाईप पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
पाईप पुरवठ्यासाठी ‘बीपीएल’ची अट शिथिल
By admin | Published: November 09, 2016 12:21 AM